Breaking news

Maval Crime : मावळच्या तत्कालिन भूमी उपअधीक्षकांवर गुन्हा दाखल; कार्यालयीन दस्त गायब केल्याचा आरोप

वडगाव मावळ (प्रतिनिधी) :  मूळ दस्तावरील क्षेत्र कमी करुन त्या आधारे घेण्यात आलेल्या नोंदी रद्द होणेबाबत तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने सदर प्रकरणाच्या अनुषंगाने महत्वाची कागदपत्रे असलेल्या फाईल संगनमताने फौजदारी पात्र कट रचून अपराधाचा पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक गहाळ केल्याने मावळच्या तत्कालिन भूमी अभिलेख उप अधीक्षक स्मिता गौड यांच्यावर बुधवार (दि.24)  वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

   मावळ भूमी अभिलेखच्या उप अधीक्षक उर्मिला गलांडे यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये याबाबत सरकारी फिर्याद दिली आहे. 

    पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी दंगनमत करून दि.14/5/2019  पुर्वी वडगाव मावळ भूमी अभिलेख कार्यालयाच्या हद्दीतील खंडाळा, ता. मावळ येथील सर्वे नं 104 सिटी सर्वे नं 11 बाबत सह जिल्हा निबंधक वर्ग-2 (अभिलेख) मुंबई या क्षेत्रीत कार्यालयामध्ये दि. 14/8/1951 रोजी नोंदणी करण्यात आलेले मुळ खरेदी दस्त क्रमांक- 2607/1951 मधील दस्तावर एकुण क्षेत्र 4 एकर 38 गुंठे हे मुळ क्षेत्र खोडुन त्याठिकाणी 31 गुंठे असे क्षेत्र नमुद केले. खोटे क्षेत्र नमूद असलेल्या खरेदी दस्ताची प्रमाणित प्रत हस्तगत करुन त्या द्वारे नगर भू मापक लोणावळा यांच्या कार्यालयात फेरफार व नोंदी रद्द होणेबाबत अर्ज सादर केला. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश मिसरीमल पोरवाल (रा.अरिहंत अपार्टमेंट, प्रधानपार्क, लोणावळा ता.मावळ जि पुणे) यांनी मूळ कागदपत्रात खाडाखोड करून तो दस्त गायब करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या अर्जाच्या आधारे प्रकरणाची पडताळणी केली असला सदर दस्त हे मावळ भूमी अभिलेख कार्यालयातून गहाळ झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मावळच्या विद्यमान भुमी अभिलेख उप अधीक्षक यांनी सदरचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी यापुर्वी लोणावळ्याचे तत्कालिन परिक्षण भूमापक विकास डेकळे यांना देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले होते.

    पोरवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुशंगाने उपअधिक्षक भूमिअभिलेख मावळ यांच्या दालनामध्ये प्रकरणाचे अनुशंगाने महत्वाची कागदपत्रे असलेली धारीका (फाईल) संगनमताने फौजदारी पात्र कट रचून अपराधाचा पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने जाणीवपुर्वक गहाळ केल्याचा गुन्हा दाखल करत गुन्ह्याचा अहवाल प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी, वडगाव मावळ यांना सादर करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक विकास सस्ते करत आहेत. 

    याविषयी बोलताना प्रकाश पोरवाल म्हणाले सध्या मावळात भूमाफियांनी जमिनी लाटण्याचा नव्या फंडा शोधून काढला आहे. मोक्याच्या ठिकाणी असणार्‍या जागेचे मालक त्याठिकाणी येत नाहीत अथवा बराच काळ कोणी आलेले नाही असा अंदाज घेत, शासकीय अधिकार्‍यांच्या संगनमताने त्या मालमत्तेचे जुने दस्तऐवज शासकीय कार्यालयातून काढायच्या त्याजागी बनावट दस्त ठेवायचे व माहिती अधिकारात ते दस्त साक्षांकित प्रती म्हणून काढायचे व जमींनीची परस्पर खरेदी विक्री करायची असा गोरख धंदा सुरु केले आहे. काही भूमाफिया व भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे मावळातील जमिनी असुरक्षित झाल्या असल्याने यांना वेळीच रोख लागणे गरजेचे असल्याचे मत पोरवाल यांनी व्यक्त केले आहे. तर अशाच प्रकारे खोटे दस्त तयार करणे, खोटे शासन आदेश लावत चुकीच्या पद्घतीने आदेश काढत दंड माफ करणे, चुकीचे निर्णय देणे असे प्रकार करणार्‍या मावळातील अन्य काही मोठ्या शासकीय अधिकार्‍यांवर लवकरच गुन्हे दाखल होणार असल्याचे संकेत देखील पोरवाल यांनी दिले आहेत. पोरवाल यांच्या या संकेताने आता पुढचा अधिकारी कोण या चर्चेला उधाण आले आहे.

इतर बातम्या