Breaking news

कार्ला, कुसगाव, पवनानगर परिसरात लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रुटमार्च; विसर्जन घाटावर गर्दी न करण्याचे आवाहन

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गावात आगामी गणेशोत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याकारिता कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने भर पावसात मौजे कुसगाव बुद्रुक, कार्ला व पवनानगर या गावांमध्ये रूट मार्च घेण्यात आला.

   सदर वेळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी गणेश मंडळे, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना गणेश विसर्जन दिवशी कोरोनाचे पार्श्वभूमीवर कोणीही विसर्जन मिरवणूक काढणार नाहीत, विसर्जन घाटावर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.

तसेच ट्रॅक्टर मधून घरोघरी गणेशमूर्ती, गौरी गणपती एकत्र गोळा करून विसर्जन स्थळी पोहचवावेत याबाबत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांना आवाहन करण्यात आले.

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कालावधीत कोणत्याही कारणास्तव आणि कोणत्याही प्रकारे गालबोट लागेल अशा स्वरूपाची जातीय किंवा अन्य कोणतीही तेढ उत्पन्न होऊ नये यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये सदर रूट मार्च काढण्यात आला. 

उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कुमार काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सचिन बनकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रूटमार्च मध्ये कार्ला पोलिस पाटील संजय जाधव यांंच्यासह पोलीस अंमलदार, होमगार्ड  सहभागी झाले होते.

इतर बातम्या