Breaking news

लोणावळा शहरात दोन महिन्यात 3153 मिमी पावसाची नोंद; मागील वर्षीपेक्षा 1646 मिमी जादा पाऊस

लोणावळा : पावसाचे आगार असलेल्या घाटमाथ्यावरील लोणावळा शहरात यावर्षी जुन व जुलै दोन्ही महिने जोरदार पाऊस झाला आहे. दोन महिन्यात शहरात तब्बल 3153 मिमी (124.13 इंच) पावसाची नोंद झाली आहे. 21 व 22 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने लोणावळा शहराची झोप उडवली होती. अनेक भागांमध्ये पाणी घुसले, घरांचे व घरातील साहित्यांचे नुकसान झाले. दोन दिवसाच्या कोसळधार नंतर पावसाने विश्रांती घेतली नसती तर लोणावळा शहरात नदीचे पाणी घुसले असते. आता आठवडाभरापासून पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र हवा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

    लोणावळा शहरात मागील वर्षी जून व जुलै या दोन महिन्यात जेमतेम 1507 मिमी (59.33 इंच) पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 1646 मिमी (64.80 इंच) जादा पाऊस झाला आहे तर मागील वर्षीची एकूण सरासरी गाठण्यासाठी आता फक्त 1069 मिमी (42.09 इंच) पाऊस हवा आहे. जोरदार पावसामुळे लोणावळा परिसरातील वलवण व लोणावळा ही दोन्ही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. पावसाची जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसात पाऊस मागील वर्षीची सरासरी ओलांडून पुढे जाईल यात शंका नाही.

इतर बातम्या