Breaking news

विकेंड लाॅकडाऊनचे उल्लंघन करणार्‍या 334 पर्यटकांवर दंडात्मक कारवाई; पावणेदोन लाख दंड वसूल

लोणावळा : विकेंड लाॅकडाऊन व कोरोना नियमांचे उल्लंघन करत लोणावळा ग्रामीण परिसरातील पर्यटनस्थळावर आलेल्या 334 पर्यटकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून 1 लाख 74 हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली. शनिवार व रविवारी ही कारवाई करण्यात आली. 334 पैकी तब्बल 320 पर्यटकांवर विनामास्क फिरल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांनी जागोजागी चेकपोस्ट लावत पर्यटकांना पर्यटनस्थळांकडे जाणार्‍या मार्गावरून माघारी पाठविले.

     पुणे जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण रोखण्यासाठी प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात आहे. असे असताना, पर्यटनस्थळांवर गर्दी होत असल्याने मागील महिन्यात जिल्हाधिकारी पुणे यांनी पर्यटनस्थळ बंदी लागू केली आहे. असे असले तरी अनेक पर्यटक या आदेशाचे व कोरोना नियमांचे उल्लंघन करत पर्यटनस्थळांवर जातात. अनेक पर्यटकांच्या चेहर्‍यावर मास्क देखील नसतो तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जागोजागी चेकपोस्ट लावत अशा पर्यटकांवर कारवाई केली जात आहे. मागील वर्षभरात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सुमारे 1500 हून अधिक जणांवर कोरोना नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करत 10 लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. 

    पर्यटकांनी कोरोनाचे नियमांचे व पर्यटनस्थळ बंदी आदेशाचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी केले आहे.

इतर बातम्या