महत्वाची बातमी | 12 फेब्रुवारी रोजी होणारा लोणावळा जागरूक नागरिकांचा मोर्चा रद्द
लोणावळा : येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होत नाही व निधी नगरपरिषदेकडे वर्ग होत नाही तो पर्यंत भूमिपूजन करणार नाही असे सांगितल्यानंतर येत्या 12 फेब्रुवारी रोजी लोणावळा जागरूक नागरिकांकडून काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आला असल्याचे जागरूक नागरिकांकडून पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन येत्या 19 फेब्रुवारी करण्याचे आमदार सुनिल शेळके यांनी आढावा बैठकीत जाहीर केले होते. मात्र या कामाचे नकाशे आजुन मंजूर नाहीत, कामाला आर्थिक व तांत्रिक मंजुरी मिळाली नाही, कामाची निविदा नाही, ठेकेदार नाही मग कामाचे भूमिपूजन कसे करणार असा प्रश्न उपस्थित करत लोणावळा जागरूक नागरिकांनी याचा जाब विचारण्यासाठी येत्या 12 फेब्रुवारी रोजी लोणावळा नगरपरिषदेवर मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. मात्र आमदार व मुख्याधिकारी यांची याबाबत चर्चा झाली, त्यांनी कामाचा आढावा घेतला, यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण होईपर्यंत भूमिपूजन न करण्याचे स्पष्ट केल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे लोणावळा जागरूक नागरिकांच्या शिष्टमंडळाने सांगितले आहे.