Breaking news

Lonavala News : प्रशासन व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे लोणावळ्यात पाणी टंचाई - देविदास कडू

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासन व ठेकदार यांच्यामुळे भांगरवाडी सह लोणावळ्यात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरु असल्याची टिका पाणी पुरवठा समितीचे माजी सभापती देविदास कडू यांनी केली आहे.

    कडू म्हणाले लोणावळ्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र प्रशासनाचा नियोजनाचा अभाव व ठेकेदाराची मनमानी यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. भांगरवाडी विभागातील सुमारे पंधरा हजारांहून अधिक नागरिकांना मागील चार दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. खाजगी टँकरच्या माध्यमातून मी पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र वाहतूककोंडीचे कारण सांगत नगरपरिषद प्रशासन भांगरवाडी विभागात टँकर देखील देण्यास तयार नाही. मागील पाच वर्षात शहरात कधीच ऐवढ्या पाणी समस्येला सामोरे जावे लागले नाही तेवढे आता जावे लागत आहे. भांगरवाडी रायवुड भागात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन दोन दिवसापूर्वी लिकेज झाली. रात्री उशिरा हे काम झाल्यानंतर पुन्हा जेसेबीचा धक्का लागल्याने सदर लाईन फुटली, आता पुन्हा पाणी बंद करून तेच काम सुरु करण्यात येणार असल्याने आज देखील नागरिकांना पाणी मिळणार नाही. प्रशासन व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषद अस्तित्व असताना अशी समस्या निर्माण झाल्यास नगराध्यक्षांसह पाणी समिती सभापती व लोकप्रतिनिधी घटनास्थळी जात तात्काळ काम मार्गी लावत नागरिकांच्या समस्या सोडवत होते. आता मात्र मुख्याधिकारी असो वा अभियंता लक्ष देत नसल्याने सर्व काम ठेकेदार भरोसे सुरु आहे. 

      भांगरवाडीसह बाजारपेठ, गावठाण, रायवुड, नांगरगाव या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सर्वच नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लोणावळा शहरातील लोकसंख्येचा विचार करता गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तुंगार्ली, गोल्ड व्हॅली, पांगोळी भागासाठी नविन पाणी योजना झाल्यानंतर उर्वरित भागात नागरिकांना मुबलक पाणी मिळणे अपेक्षित असताना पाणी कमी मिळू लागले आहे. यामागील नेमके गौडबंगाल काय आहे याचा खुलासा प्रशासनाने करावा अन्यथा नगरपरिषदेच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देविदास कडू यांनी दिला आहे. लोणावळ्यात मुबलक पाणी असून देखील केवळ प्रशासन व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत असल्याने या कृत्रिम टंचाईला तेच जबाबदार असल्याचा आरोप कडू यांनी केला आहे.

इतर बातम्या