Breaking news

Lonavala News : हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी लोणावळा विद्यार्थ्यांची रॅली

लोणावळा : भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशात सर्वत्र घरांवर तिरंगा झेंडा फडकविण्यात येणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी आज लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस स्टेशन व पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा यांच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लोणावळा शहरातील विविध शाळांचे सुमारे एक ते दिड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. मावळा पुतळा चौकातून सकाळी साडेदहा वाजता या रॅलीला सुरुवात झाली. लोणावळा नगरपरिषद कार्यालयाशेजारी या रॅलीचा समारोप झाला. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत देशभक्तीपर घोषवाक्य हातात घेत, घोषणा दिल्या. नागरिकांमध्ये हर घर तिरंगा या अभियानाबाबत जागृती करण्यासाठी सदर रॅलीचे आयोजन करण्यात आलव होते. यामध्ये मुख्याधिकारी पंडित पाटील, पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे डीवायएसपी अभिजीत पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी काही सामाजिक संस्थाचे पदाधिकारी हे देखील सहभागी झाले होते. पोलीस ठाण्याचे कर्मचारी, प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी हे सहभागी झाले होते. रॅलीच्या समारोपाच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांना तिरंगा झेंडा घरावर कसा लावावा, झेंड्याची लांबी रुंदी किती असावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्या नागरिकांना झेंडे हवे असतील त्यांना नगरपरिषद ना नफा ना तोटा तत्वावर झेंडे उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. रॅलीत सहभागी झालेल्या मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

इतर बातम्या