Breaking news

Lonavala News : "डोळ्यांची प्राथमिक काळजी" या विषयावर नेत्ररोगतज्ञ डॉ रागिणी पारेख यांचे व्याख्यान; ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम

लोणावळा : ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळाच्या वतीने  'डोळ्यांची प्राथमिक काळजी" या विषयावर जे जे हॉस्पिटल मुंबई येथील प्राध्यापक डॉ रागिणी पारेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत पुराणिक उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना, डॉ पारेख यांनी ज्येष्ठाना डोळ्यांची निगा सर्वानीच कशी राखावी यावर भाष्य केले. रक्तदाब व मधुमेह असणाऱ्यांनी डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी असे सांगितले. चरबीयुक्त पदार्थ खाऊ नयेत, तसेच डोळ्याला अपाय झाल्यास घरगुती उपाय न करता, त्वरित तज्ञांना संपर्क करावा असे त्या म्हणाल्या. मोतीबिंदू व काचबिंदू यावरही त्यांनी माहिती व उपचार पद्धती नमूद केली. नेत्रदान करण्यासंदर्भात त्यांनी आवाहन केले, तसेच याविषयीची माहिती दिली. प्रशांत पुराणिक यांनी बोलताना अशा प्रकारचे कार्यक्रम सतत व्हावेत, तसेच यापुढे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध रोगनिदान शिबिर आयोजित करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. प्रस्ताविकामध्ये संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे यांनी संघाच्या कामाची माहिती दिली. तसेच पारेख यांचा परिचय करून दिला. व्याख्यान झाल्यानंतर संघाच्या  वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ज्येष्ठ विठूनामाचा गजर करीत, टाळ मृदुंगात तल्लीन झाले होते.

इतर बातम्या