Breaking news

Lonavala News : महामार्गासाठी जमिन संपादनाचा मोबदला निम्म्याने कमी करणे हा शेतकर्‍यांवर अन्याय - माजी खासदार राजु शेट्टी

लोणावळा : महामार्गासाठी जमिन संपादन करताना पुर्वी जागेचा चारपट मोबदला दिला जात होता तो आता निम्मा करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. हा महाराष्ट्रातील शेतकर्‍य‍ांवर अन्याय असून याबाबतचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजु शेट्टी यांनी दिली. पनवेल येथे एका बैठकीसाठी जात असताना माजी खासदार शेट्टी लोणावळ्यात थांबले होते. यावेळी पत्रकारांनी शेट्टी यांच्याशी संवाद साधला.

   पावसात भिजून शेतकर्‍य‍ांची मते मागणार्‍या शरदचंद्र पवार यांना हा निर्णय मान्य आहे का असा सवाल राजु शेट्टी यांनी उपस्थित केला. शेट्टी म्हणाले 2013 साली मनमोहन सरकारने केंद्रांत भुमी अधिग्रहणाचा कायदा केला. त्याला नख लावण्याचे काम केंद्रांत मोदी सरकारने तर राज्यात आघाडी सरकारने केले आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन विकास साधण्याचा कुटिल डाव यशस्वी होऊ देणार नाही, याकरिता शेतकरी आंदोलन उभे करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

इतर बातम्या