Breaking news

Lonavala Gramin News : थर्टी फस्टच्या पुर्वसंध्येला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेकायदा हत्यार बाळगणार्‍यांना केली अटक

लोणावळा : थर्टी फस्ट व न्यु इयरच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात  बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींचा शोध व माहिती घेण्याची विशेष मोहिम हाती घेतली असता मळवली जवळील देवले येथे एका युवकाला विनापरवाना एका गावठी बनावटीच्या पिस्तूल व एका जिवंत काडतुससह अटक केली असून, त्याला पिस्तूल देणाऱ्यालाही लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

    प्रशांत शांताराम आंबेकर (रा. देवले, मावळ) असे विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, अनिकेत अशोक कालेकर (रा. काले, पवनानगर, मावळ) असे पिस्तूल पुरवठा करणाऱ्यांचे नाव आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मळवली व देवले परिसरात एक तरुण विनापरवाना अग्नीशस्त्र  (पिस्तूल) बाळगत संशयास्पद फिरत असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना एका गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर व अनिल लवटे, पोलीस कर्मचारी शांताराम बोकड, अमित ठोसर, विजय गाले, शकील शेख, गणेश होळकर, शरद जाधवर, किशोर पवार व सिद्धेश शिंदे यांनी मळवली देवले रोडवर सापळा रचून प्रशांत आंबेकर याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळाले. सदर  पिस्तूलाबाबत विचारले असता, त्याने अनिकेत अशोक कालेकर याने हे पिस्तूल दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार या प्रकरणी पोलिसांनी अनिकेत कालेकर ताब्यात घेत अटक केली असून, या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहे.

इतर बातम्या