Breaking news

Lonavala BJP News : रेल्वेच्या ढिसाळ कारभारा विरोधात भाजपाच्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणावळा : रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ व चालढकल कारभाराच्या विरोधात आज लोणावळा शहर भाजपाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला लोणावळा व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सोबतच दररोज अर्धा ते पाऊण तास बंद राहणारे रेल्वे गेट आज मात्र रेल्वे गाडी पास होताच तात्काळ उघडत असल्याचे चित्र पहायला मिळाले. दररोज या गेटवर नागरिक गेट अर्धा ते पाऊण तास उघडत नसल्याने हैराण होत होते. किमान चार ते पाच गाड्या गेल्याशिवाय गेट उघडला जात नव्हता. यामुळे दुतर्फा अर्धा किमीपेक्षा जास्त अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागत होत्या. तर या गर्दीत वाहनांचे किरकोळ अपघात व वाद ही नित्याची बाब बनली होती. मात्र सिंग्नल यंत्रणा स्वयंचलित असल्याचे कारण देत गेट सतत बंद ठेवला जात होता. आज मात्र रेल्वे गाडी पास झाल्यानंतर तात्काळ गेट उघडला जात असल्याचे पाहून कालपर्यत रेल्वे प्रशासन जनतेची फसवणूक व दिशाभूल करत होती का असा प्रश्न नागरिकांना पडत होता सोबतच गेट तात्काळ उघड असल्याने समाधान देखील व्यक्त केले. भांगरवाडी रेल्वे गेट येथे दुतर्फा ही स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक व भाजपा गटनेते देविदास कडू, माजी सभापती प्रदिप थत्ते, हर्षल होगले, अरुण लाड, शुभम मानकामे, अर्जुन पाठारे, दीपक कांबळे, सुरेश गायकवाड, अभय पारख, रुपेश नांदवटे, नंदू जोशी, परिजा भिल्लारे, विजया मराठे, श्रिया रहाळकर, आदिती होगले, सुप्रिया देशपांडे, बाबु संपत, योगेश मोदी यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागण्या : 1) लोणावळा शहरातील वाहतूककोंडीवर प्रभावी पर्याय ठरणार्‍या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. ते काम त्वरित मार्गी लागावे. 2) लोणावळा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुर्वीसारखा थांबा चालू करण्यात यावा 3) स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वे परिसरात वेळोवेळी स्वच्छता अभियान राबवावे. 4) पुणे लोणावळा लोकलच्या सर्व सेवा पुर्ववत कराव्यात तसेच दुपारच्या सत्रात लोकल च्या फेर्‍या वाढवाव्यात.

इतर बातम्या