Breaking news

Local Train News | पुणे लोणावळा दरम्यान आता दुपारी धावणार लोकल ट्रेन; दोन फेऱ्या वाढविल्या

लोणावळा : लोणावळा शहर व ग्रामीण भागातील जागरूक नागरिकांनी शुक्रवारी 12 जानेवारी रोजी लोणावळ्यात रेल्वे रोको आंदोलन करत डेक्कन क्वीन ही गाडी 20 मिनिटे रोखून धरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अखेर पुणे  लोणावळा दरम्यान दुपारच्या सत्रात लोकल ट्रेन च्या दोन फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजीनगर येथून दुपारी 12 वाजून 05 मिनिटांनी आणि लोणावळा येथून सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी या लोकल सोडण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामानिमित्त प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

     कोरोनाच्या काळात रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी पुणे लोणावळा लोकल सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचे सावट संपल्यानंतर लोकल सेवा सुरू केली होती; पण दुपारच्या टप्यातील लोकल सेवा बंद होती. त्यामुळे विद्यार्थी व कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांचे हाल होत होते. त्यामुळे दुपारची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती; पण रेल्वे प्रशासनाकडून दुपारच्या टप्यात देखभाल दुरुस्तीची कामे केली जात असल्यामुळे लोकल सेवा सुरू करण्यास नकार दिला जात होता; अखेर लोणावळा शहर व ग्रामीण भागातील जागरूक नागरिकांकडून दुपारची लोकल सेवा सुरू करावी व सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांना लोणावळ्यात थांबा द्यावा या मागणीसाठी रेल्वे रोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून पाच एक्सप्रेस गाड्यांना देखील थांबा देण्यास मान्यता दिली आहे.


इतर बातम्या