Breaking news

कात्रज दूध संघावर महिलाराज; अध्यक्षपदी केशर पवार तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर यांची बिनविरोध निवड

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) अध्यक्षपदी शिरूर तालुक्यातील केशर सदाशिव पवार यांची, तर उपाध्यक्षपदी दौंड तालुक्यातील राहुल दिवेकर यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी महिलेला पहिल्यांदा संधी मिळाली आहे. कात्रज संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसाठी नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी मिलिंद सोबले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये पवार आणि दिवेकर यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. 

     अध्यक्ष केशर पवार या शिरुर तालुक्यातील जातेगाव येथील असून चौथ्यांदा संघावर निवडून आल्या आहेत. 2014 मध्ये त्या संघाच्या उपाध्यक्ष होत्या. उपाध्यक्ष राहुल दिवेकर हे प्रथमच संघावर निवडून आले आहेत. या बैठकीमध्ये अध्यक्ष निवडीसाठी गोपाळराव म्हस्के, मावळते अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी पवार यांच्या नावाला अनुमोदन दिले, तर उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांना कालिदास गोपाळघरे यांनी अनुमोदन दिले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे, संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार केला.

    अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नावे निश्चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊसवर नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि जिल्ह्यातील आमदार यावेळी उपस्थित होते. जुन्या आणि अनुभवी संचालकांना संधी देण्याचा विषय पुढे आला तेव्हा केशर पवार आणि भगवान पासलकर यांची नावे समोर आली होती. राजकीयदृष्ट्या पवार यांचे पारडे जड ठरल्याने त्यांची अध्यक्ष पदी वर्णी लागली.

इतर बातम्या