Breaking news

विद्यार्थी आणि चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी लोणावळा पुणे लोकल रेल्वेच्या फेर्‍या वाढवा

पिंपरी चिंचवड : विद्यार्थी व चाकरमनी यांची प्रवासाची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तात्काळ लोणावळा पुणे रेल्वेच्या फेर्‍या वाढवाव्यात अशी मागणी पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

   या निवेदनात म्हंटले आहे की, मागील दीड महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. तसेच, मार्च 2020 पासून कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाही मध्य रेल्वेने पुणे लोणावळा लोकल सेवा अत्यंत कमी प्रमाणात सुरु ठेवली आहे. सध्याच्या घडीला लोकलच्या फक्त 12 फेर्‍या सुरु ठेवल्या आहेत. अलिकडेच शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये नियमित सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी लोणावळा, मावळ, तळेगांव, चिंचवड तसेच ग्रामीण भागांतून लोणावळा शिवाजी नगर, खडकी, पुणे येथे शाळा अथवा महाविद्यालयात शिक्षण घेतात त्यांची संख्या सुमारे 20 हजार ऐवढी प्रचंड आहे.

    या विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात येण्या जाण्यासाठी लोकल रेल्वे सेवेच्या तुटपुंज्या फेर्‍या उपलब्ध आहेत, त्यामुळे नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना महागड्या खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो व त्यांना मोठया प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कोरोना महामारीच्या कालावधीत नोकर्‍या गेल्या आहेत. महागड्या खाजगी वाहनांचा प्रवास आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर असल्याने बरेच विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात नियमित जात नाहीत. पुणे-लोणावळा लोकल सेवा अपुरी व विस्कळीत असल्याचा सर्वाधिक फटका हजारो विद्यार्थ्यांना होत आहे. आपण एक संवेदनशील मंत्री महोदया आहात. वरील पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी, त्यांच्या भविष्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन, पुणे लोणावळा दरम्यान लोकल रेल्वे सेवेच्या फेर्‍या वाढविण्यासाठी, राज्य शासनाच्या वतीने मध्य रेल्वे प्रशासनाला शिफारस करावी. अशी मागणी ईक्बाल भाईजान मुलाणी अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवड (पुणे) व सदस्य, केंद्रीय रेल्वे पुणे विभाग सल्लागार समिती यांनी केली आहे.

इतर बातम्या

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट इ. यांच्याकरिता सीआरपीसी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी; पालन न करणाऱ्या आस्थपनांवर होणार कठोर कायदेशीर कारवाई