Breaking news

Lonavala Pune Local : लोकलच्या फेर्‍या वाढवा; शाळकरी मुलांना प्रवासाची परवानगी द्या

लोणावळा : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शाळा व महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. लोणावळा परिसरातील शाळांमध्ये येणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात तसेच लोणावळा व परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे परिसरात जात असतात. या मुलांसाठी रेल्वे हा प्रवासाचा एकमेव सोपा पर्याय आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या लोकलमध्ये फक्त दोन डोस झालेल्या नागरिकांना मासिक पास द्वारे प्रवेश दिला जात आहे. शाळकरी मुले ही 18 वर्षाखालील असल्याने त्यांचे लसीकरण झालेले नाही तसेच काही 18 वर्षावरील मुलांचा एकच डोस झालेला आहे. अशा सर्वांसाठी लोकलमधून प्रवासाची मुबा देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे.

    कोरोना साथरोगाचा प्रसार कमी झाल्याने शासनाने टप्प्या टप्प्यांने सर्वकाही अनलाॅक केले आहे. रेल्वे प्रवास देखील सुरु झाला असला तरी लोकलच्या फेर्‍या अद्याप पुर्वीप्रमाणे सुरु झालेल्या नाहीत. सकाळ व संध्याकाळी लोकल सेवा सुरु आहे. मात्र याप्रवासा करिता कोरोना लसीचे दोन डोस हे प्रमाण धरण्यात आलेले आहे. 18 वर्षाखालील मुलांचे अद्याप लसीकरण सुरु झालेले नाही. मात्र पाचवी ते बारावी शाळा व महाविद्यालये सुरु झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थांना शाळेत येण्यासाठी लोकल अभावी अडचणी येत आहेत. शाळकरी मुलांची ही अडचण ध्यानात घेता त्यांना शाळेचे ओळखपत्र पाहून प्रवासाची मुबा देण्यात यावी अशी मागणी पुढे आली आहे. मुंबई लोकलमध्ये शाळकरी मुलांना प्रवासाची सवलत देण्यात आली आहे त्याच धर्तीवर लोणावळा पुणे लोकलमध्ये देखील प्रवासाची सवलत देण्यात यावी. तसेच लोकल सेवा पुर्वीप्रमाणे पुर्ण क्षमतेने सुरु करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.

इतर बातम्या