Breaking news

नागरिकांनो सावधान; अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास 500 रुपये दंड व लाॅकडाऊन संपेपर्यंत वाहन होणार जप्त

लोणावळा : अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर फिरणार्‍यांनो सावधान; कोरोना साथरोगाच्या नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाकडून जागोजागी चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. याठिकाणी अत्यावश्यक कामाशिवाय फिरताना कोणीही आढळल्यास त्यांना 500 रुपये दंड व लाॅकडाऊन संपेपर्यंत अथवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत वाहन जप्त करण्याचे अधिकारी आजपासून जिल्हाधिकारी पुणे यांनी पोलीस विभागाला दिले आहेत.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र जमावबंदी व संचारबंदी लागू आहे. यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. असे असताना देखील काही नागरिक विनाकारण फिरत असल्याची बाब समोर आली आहे. या अनुषंगाने व पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे पोलिसांनी दंडात्मक कारवाईसह वाहन ताब्यात घेण्याचे अधिकार मिळावे, ह्या विनंतीनुसार वरील अधिकार पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडल्यास दंडात्मक कारवाईसह वाहन जप्त होऊ शकते. ताेच होम क्वारंटाईन मधील रुग्ण बाहेर फिरल्यास त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जाणार आहे. कोरोनाचा प्रभाव आजून कमी झालेला नसल्याने महाराष्ट्र शासनाकडून लाॅकडाऊनचा कालावधी 1 जुन पर्यत वाढविण्यात आला आहे. यामुळे सर्वांनी आदेशाचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच नागरिकांना आंतरजिल्हा व इंटरसिटी प्रवासाकरिता ई पास अत्यावश्यक करण्यात आला आहे. नाकाबंदीच्या वेळी तसेच आंतरजिल्हा चेकपोस्ट येथे नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय अथवा कारणाशिवाय घराबाहेर आल्याचे मिळून आल्यास त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सह इतर कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

इतर बातम्या