… त्याठिकाणी पुन्हा काही दुर्घटना घडल्यास संबंधित ठेकेदार व त्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील - आमदार सुनील शेळके
लोणावळा : कार्ला मळवली येथील पुलाचे काम 30 जुलै पर्यंत पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रयत्न आहे. मागील पंधरा दिवस पुणे जिल्ह्यात खडी क्रश स्टोन विक्रेत्यांचा संप असल्याने ठेकेदाराला पुलाचे काम करण्यासाठी मटेरियल उपलब्ध न झाल्याने काम रखडले होते, आता कामाला वेगात सुरुवात झाली आहे. आमदार सुनील शेळके म्हणाले, त्याठिकाणी पर्यायी पुलावरून एक व्यक्ती वाहून गेल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत, मात्र अधिकाऱ्यांकडून याबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती आलेली नाही. ती व्यक्ती तेथूनच वाहून गेली का दुसरीकडून वाहून आली याबाबत चौकशी करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. मात्र त्याठिकाणी पुन्हा काही दुर्घटना घडल्यास त्याला संबंधित ठेकेदार व त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हे दखल केले जातील असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
मावळ माझा न्युज चा वाॅटस्अप ग्रुप जॉईन करा
कार्ला मळवली येथील पुलाचे काम रखडल्याने सध्या या भागातील सर्व वाहतूक ही सदापुर गावातील रस्ता व देवले रस्त्यावरून सुरू आहेत. मात्र या दोन्ही रस्त्यांची दुर्दशा झालेली असल्याने त्या रस्त्यावर रोज अपघात होत आहेत. वाहने देखील रस्त्यावरून पलटी होत आहेत. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यांची डागडुजी करण्याची दखल घेत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मावळ तालुक्यातील पाऊस सर्वश्रुत असताना देखील नदीवरील पुलाचे काम करण्यात चालढकल करण्यात आली. मार्च महिन्यापासून येथील ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुलाचे काम 31 मे पर्यंत पूर्ण करण्याची मागणी करत होते. आज काम पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठा वळसा घालून खड्डेमय रस्त्यांवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.