Breaking news

Traffic.. Traffic & Traffic : कार्ला - मळवली कडे जाताय.. थांबा… पहिली ही वाहतूककोंडी पहा… मंग निर्णय घ्या…

कार्ला (प्रतिनिधी) : पर्यटनासाठी व देवदर्शनासाठी कार्ला एकविरा देवी व मळवली परिसरात जाण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा… या भागात आज सकाळपासून निर्माण झालेली वाहतूककोंडी पहा… परिस्थितीचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या… अन्यथा आजचा तुमचा दिवस या वाहतूककोंडीत जाऊ शकतो. रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक लोणावळा खंडाळा व कार्ला परिसरात दाखल झाल्याने आज सर्वत्र वाहनांच्या रांगा व वाहतूककोंडी अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोणावळा व खंडाळा भागात मोठी कोंडी झाल्याने पर्यटकांनी कार्ला लेणी, भाजे लेणी व धबधबा परिसरात जाण्यासाठी मोर्चा वळविल्याने कार्ला फाटा परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली आहे. एकविरा देवीच्या पार्किंग पासून कार्ला फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे मळवली रेल्वे स्थानकापासून कार्ला गावापर्यंत रांगा आल्या आहेत. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर दुतर्फा शिलाटणे फाटा व दुसरीकडे एमटीडीसी पर्यत वाहनांच्या रांगा जात प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे. वरसोली टोलनाक्यावर देखील दुतर्फा वाहनांच्या लांबवर रांगा गेल्या आहेत. आजचा रविवार हाऊसफुल्ल झाल्याने पर्यटनस्थळासोबत सर्वच रस्त्यावर कोंडी झाली आहे. भांगरवाडी रेल्वे गेटच्या वाहनांच्या रांगा नांगरगावपर्यत आल्याने तर भांगरवाडी बाजुला कृष्णा फास्टफुड व लोहगड दर्शनपर्यत गेल्या होत्या. नाक्यावरील गर्दी सर्वश्रूत आहे. आजच्या कोंडीने स्थानिकांसह पर्यटकांची गोची केली आहे. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्यासह सर्व पोलीस फौजफाटा रस्त्यावर तैनात असला तरी वाहनांच्या अफाट संख्येपुढे पोलीस बळ व रस्ते अपुरे पडले होते.

इतर बातम्या