Breaking news

Lonavala Crime News : बनावट सोन्याच्या विटा व हिरे खरे असल्याचे भासवून 10 लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक

लोणावळा : बनावट सोन्याच्या विटा व डायमंड खरे असल्याचे भासवून एका मोठ्या कंपनीच्या मालकाची फसवणूक करून त्याला 10 लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. भिमा गुलशन सोळंकी (मूळ रा. बडोदा गुजरात, सध्या रा. देहूरोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबई येथील राहणारे व सॉफ्टवेअर कंपनीचे मालक असलेले समद हमीद मकानी (वय- 63 वर्षे ) यांना काही दिवसांपूर्वी आरोपी भीमा सोळंकी हा भेटला होता. यावेळी त्याने मकानी यांना सांगितले की, मी जेसेबी मशिनने कर्नाटक, बेंगलोर या ठिकाणी जुने घर पाडण्याचे काम करीत असताना मला त्या घरामध्ये सोन्याच्या विटा व डायमंडची (हिऱ्यांची) पिशवी मिळून आली आहे. ते मिळालेले सोने विक्री करण्यासाठी मला मदत करा.  सध्या मला पैशांची खूप गरज असून,  मला सध्या 10 लाख रुपये द्या असे सांगत अमीश दाखवले. त्यानंतर त्याने मकानी यांना बनावट सोन्याची विट व बनावट डायमंड देवून फसवणूक केली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आठवड्यापूर्वी फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे,  लोणावळा उपविभागीय पोलीस अधीकारी भाऊसाहेब ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन रावळ,  प्रदीप चौधरी व सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, पोलीस कर्मचारी हनुमंत पासलकर, युवराज बनसोडे,  राजु मोमीन, बाळासाहेब खडके, शरद जाधवर, धिरज जाधव, प्राण येवले, दगडू विरकर, मच्छिंद्र पानसरे, मनिषा डमरे यांच्या पथकाने मंगळवारी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपीला सापळा रचून ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. संबंधित व्यक्तीने अशाप्रकारे कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा असे आव्हान पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी जनतेला केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या