Breaking news

Maval News : वडगाव मावळ येथे जुगार अड्ड्यावर छापा; 9 जणांवर गुन्हा दाखल - साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

वडगाव मावळ : वडगाव मावळ येथे रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत नऊ जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल व वाहने असा 6 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

      लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वडगाव मावळ  हद्दीत आंबेडकर कॉलनी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम जुगार खेळत व खेळवत आहेत. या माहितीच्या आधारे रविवारी (17 सप्टेंबर) रात्री 11.45  वाजता लोणावळा उपविभाग व वडगाव मावळ पोलीस यांनी पशुवैदयकीय दवाखाना शेजारी असलेल्या पत्रा शेड मध्ये छापा टाकला असता. त्याठिकाणी वडगाव, तळेगाव, देहूरोड व ग्रामीण भागातील 9 जण तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले. वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम सन 1887 अधिनियाप्रमाणे त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. 

      लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस हवालदार अंकुश नायकुडे, पोलीस शिपाई सुभाष शिंदे, पोशि पवार, पो हवा संजय सुपे, पोना, शशिकांत खोपडे, पो कॉ अंकुश पाटील यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास म. पोसई आर. आर. मोहिते या करीत आहेत.

आगामी गणेशउत्सव काळात गणपती मंडळातील सदस्य कोणत्याही प्रकारचा जुगार किंवा बेकायदेशिर अवैध धंदे करताना मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा सत्यसाई कार्तिक यांनी दिला आहे. तसेच कोठेही जुगार व अवैद्य धंदे सुरू असल्याचे दिसल्यास नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आव्हान त्यांनी नागरिकांना केले आहे.

इतर बातम्या