आनंदवार्ता । नवनीत फाउंडेशन वतीने मावळातील 26 माध्यमिक शाळांना स्मार्ट टिव्ही संचांचे मोफत वाटप

लोणावळा : नवनीत फाऊंडेशन दादर मुंबई यांच्या वतीने मावळ तालुक्यातील 26 शाळांना ई लर्निंग साठी आवश्यक असणारे स्मार्ट टिव्ही संच भेट दिले आहेत.
लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण बलकवडे व जेष्ठ शिक्षक देवराम पारीठे यांनी नवनीत फाउंडेशन दादर मुंबई यांच्याशी संपर्क साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांना ई- लर्निगसाठी स्मार्ट टिव्हीची मागणी केली होती. त्यावेळी फाउंडेशनने तुम्ही पुढाकार व सहकार्य केल्यास तुमच्यासह मावळातील एकूण 26 माध्यमिक शाळांना मोफत स्मार्ट टिव्ही भेट देऊ असे आश्वासित केले होते.
फाउंडेशनच्या या प्रतिसादाला साद देत श्री बलकवडे व श्री. पारीठे यांनी केवळ एकाच शाळेचा विचार न करता मावळातील दुर्गम भागातील इतर 25 गरजु शाळांचा शोध घेऊन फाऊंडेशनला सहकार्य केले. या पाठपुराव्यामुळे नवनीत फाउंडेशन मुंबई यांनी दिनांक 22 व 23 मे रोजी मावळातील ग्रामीण भागातील दुर्गम भागातील 26 माध्यमिक शाळांना मोफत स्मार्ट टिव्ही संच वितरित करण्यात आले. या स्मार्ट टिव्ही मुळे ग्रामीण व अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनासाठी ई लर्निगची बहुमोल मदत होणार आहे.