Breaking news

धक्कादायक घटना; चासकमान धरणात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

खेड : खेड तालुक्यातील गुंजाळवाडी गावाच्या हद्दीत चासकमान या धरणात पोहण्यासाठी गेलेल्या मुलांपैकी 4 जणांचा जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. हे चारही विद्यार्थी गुंजाळवाडी गावातील तिवळी हिल येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल मधील आहेत. निवासी असलेल्या या विद्यार्थ्यांना उद्यापासून सुट्टी लागणार होती. त्यामुळे या शाळेतील 34 विद्यार्थी शिक्षकांसह पोहण्याचा सराव करण्यासाठी चासकमान धरणाच्या जलाशयात गेले होते. त्यावेळी ही दुदैवी घटना घडली. कमरे ऐवढ्या पाण्यात हे विद्यार्थी पोहण्याचा सराव करत असताना एक मोठी लाट आली त्यामध्ये सहा ते सात विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. त्यापैकी काहींना शिक्षकांनी वाचविले मात्र चार जण लाटेच्या वेगामुळे खोल पाण्यात बुडाले असल्याचे उपस्थित शिक्षकांनी सांगितले.

तनिषा देसाई, रितिन डीडी, परिक्षित अग्रवाल, नव्या भोसले अशी या बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींची नावे आहेत. घटनेची माहिती समजल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धरणाकडे धाव घेतली. पाण्यात उतरत विद्यार्थांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत, या घटनेचा तपास सुरु केला आहे. दरम्यान डोंगरावर बंदिस्त असलेल्या शाळेतील हे विद्यार्थी खाली आले कसे, पोहण्याचा सराव करण्यासाठी जाताना काय खबरदारी घेतली होती का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले असले तरी निष्पाप विद्यार्थ्यांचे गेलेले जीव ही सर्वांच्या मनाला चटका लावून गेलेली घटना आहे. गुरुवारी पुणे जिल्ह्यात अशा दोन घटना घडल्या चासकमान येथे चारवतर भाटघर धरणात पाच महिलांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

इतर बातम्या