मोठी बातमी | अखेर पुरंदरे शाळा मैदानावरील सर्कस ची परवानगी लोणावळा नगरपरिषदेने केली रद्द
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले पुरंदरे मैदान एका सर्कस साठी एक महिना भाड्याने दिले होते. सदर सर्कस चालकाने प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता मैदान जवळपास 3 फूट खोदले आहे. यामुळे मैदानाची वाट लागली आहे. ही बाब लोणावळा शहर भाजपाने निदर्शनास आणून दिली. माध्यमांनी याबाबत आवाज उठवला. याची दखल घेत लोणावळा शहरातील सर्व पक्षीय नेत्यांनी देखील प्रशासनाला जाब विचारण्याचे जाहीर केले. या सर्व बाबींची दखल घेत. लोणावळा नगरपरिषदेने सर्कस चालकाने केलेलं कृत्य चुकीचे असल्याने मान्य करत त्यांनी सर्कस ची परवानगी रद्द केली आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी कोणताही विचार न करता परवानगी दिली होती. त्यांना देखील करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी सांगितले.
साबळे म्हणाले, सर्कस साठी परवानगी देण्यात आली होती. मात्र सर्कस चालकाने त्याठिकाणी केलेले खोदकाम चुकीचे आहे. मैदानाचे जे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई म्हणून त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये जमा करून घेण्यात आले असून मैदानातील त्याचे साहित्य तात्काळ काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या 20 फेब्रुवारीच्या आत सदरचे मैदान पूर्वी होते तसे करून घेतले जाईल. महसुल विभागाची रीतसर परवानगी घेत मुरूम टाकत, तो रोलर फिरवून टणक करत त्यावर लाल माती टाकत मैदान तयार करून घेतले जाईल. तसेच यापुढील काळात स्थानिक सामाजिक व धार्मिक उपक्रम वगळता इतर कार्यक्रमांना मैदान देताना त्याची एक नियमावली तयार करून घेतली जाईल असे स्पष्ट केले.
एक एक महिना मैदान भाड्याने दिले जात असल्याने त्याठिकाणी खेळासाठी जागा उपलब्ध होत नाही. शेजारी असलेल्या पुरंदरे शाळेचे वार्षिक क्रीडा महोत्सव देखील रद्द करण्यात आला होता. ही बाब प्रशासक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ हा निर्णय घेतला आहे.