Breaking news

Expressway News : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातांची मालिका थांबणार तरी केव्हा?

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अपघातांची ही मालिका थांबणार तरी केव्हा असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाट परिसरामध्ये दैनंदिन अपघात सुरू आहेत. मागील वीस वर्षांमध्ये या मार्गावर काही हजार अपघात होऊन त्याच प्रमाणात नागरिकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जायबंद झाले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले मात्र कोणत्याही बाबींना समाधानकारक यश न आल्याने या मार्गावर सातत्याने अपघात व वाहतूक कोंडी होत आहे. राज्यातील कोणातरी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर येथे यंत्रणांना जाग येते चौकशांच्या फेऱ्या सुरू होतात व पुढे काहीच होत नाही. सर्वसामान्य नागरिक व प्रवासी यांचे अपघात व मृत्यू याची तर या मार्गावर गिनतीच केली जात नाही. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे हा 94 किलोमीटर अंतराचा एक्सप्रेस वे आहे. कळंबोली ते किवळे असा हा मार्ग असून या जलदगती मार्गामुळे मुंबई व पुणे ही दोन्ही राजधानीची शहरे कमीत कमी वेळात जोडली जावीत, नागरिकांचा वेळ वाचावा व वाहतूक कोंडीची समस्या सुटावी याकरिता सदर मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र यापैकी काहीही झाले नसून एक्सप्रेस वे हा सततच्या वाहतूककोंडी मुळे कासवगती झाला आहे तर सततचे अपघात यामुळे सदर एक्सप्रेस वे हा मृत्यूचा सापळा बनला आहे. एक्सप्रेस वे वरील अपघातांना वाहनांचा अतिवेग व लेन कटिंग हे जबाबदार असल्याचा निष्कर्ष काही वर्षांपूर्वी काढण्यात आला होता. मानवी चुकांमुळे एक्सप्रेस वे वर अपघात वाढले असल्याचे सांगत या मानवी चुका सुधारण्याकरिता मार्गावर अनेक प्रयोग करण्यात आले. उर्से व खालापूर टोलनाका या ठिकाणी वाहन चालकांची जागृती करण्यात आली. मात्र तरीदेखील वाहन चालक नियमांकडे दुर्लक्ष करत वाहने चालवत असल्याने लेन कटिंग ही या मार्गावरील सर्वात मोठी समस्या बनली आहे. वाहनांच्या अतिवेगावर नियंत्रण ठेवण्याकरिता मार्गावर अनेक ठिकाणी स्पीड गन च्या माध्यमातून दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. यामुळे काही अंशी वाहनांचा वेग कमी होऊन खंडाळा ते किवळे व खालापूर टोल नाका ते कळंबोली दरम्यान अपघातांचे प्रमाण घटले आहे. मात्र अमृतांजन पूल ते खालापूर टोल नाका या घाट परिसरामध्ये अपघातांचे प्रमाण वाढले असून दररोज या भागात अपघात होत आहेत. याला मानवी चुकांसोबतच या परिसरामध्ये सुरू असलेली कामे, चुकीच्या पद्धतीने राबवलेली वेग मर्यादा व स्पीडगणच्या चुकीच्या कारवाया यादेखील कारणीभूत आहेत. अमृतांजन पूल ते खालापूर टोल नाका हा पूर्ण परिसर उतार व चढण असा आहे. मुंबईकडे जाताना पूर्णतः उतार असताना या भागात वाहनांची वेग मर्यादा ताशी 40 व 50 किलोमीटर अशी ठेवण्यात आली असून किलोमीटर 37 या ठिकाणी स्पीड गन वाहने उभी करण्यात आली आहेत. यामुळे उतारावर वेगाने आलेले वाहन अचानक वेग मर्यादेचे बोर्ड व स्पीड गन वाहन पाहून वाहनांचा वेग कमी करतात व त्याच वेळी मागून वेगात येणारी वाहने त्यावर आदळून अपघात होत आहेत. खरंतर हा उतार एवढा तिव्र आहे की वाहनांच्या एक्सलेटर वरील पाय काढला तरी वाहन ताशी किमान 60 ते 70 किलोमीटर वेगाने जाईल असे असताना या ठिकाणी स्पीड गन कारवाया करत वाहन चालकांची लुट सुरु आहे. खरंतर सदरची वेग मर्यादा व कारवाया पाहता या मार्गाला एक्सप्रेस वे मानावा की राज्य महामार्ग असा प्रश्न वाहन चालकांना देखील पडत आहे. अपघाताचे दुसरे कारण म्हणजे सदर उतारावर अवजड वाहनांचे चालक इंधन वाचवण्याकरिता वाहने न्यूट्रल करून अथवा बंद करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे समोरील वाहनांचा अचानक वेग कमी झाल्यानंतर सदर अवजड वाहन नियंत्रणातून सुटते व समोर जाणाऱ्या वाहनावर आदळते अथवा पलटी होते. पुण्याकडे येताना सदर भागामध्ये घाट चढताना लेन नियमांची पूर्णतः पायमल्ली केली जाते सर्व चारही लेन व्यापून अवजड वाहने घाट चढत असतात यामुळे लहान प्रवासी वाहने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना अपघात होत आहेत. सदरच्या घटना डोळ्यादेखत घडत असताना महामार्ग पोलीस हे सदर बाबी रोखण्याकरिता उपाययोजना करण्याऐवजी केवळ स्पीड गन चा बागुलबुवा करत आपण किती कर्तव्यदक्ष आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. मागील वर्षभरामध्ये खंडाळा घाट परिसरात अमृतांजन पूल ते खालापूर टोल नाका यादरम्यान झालेले सर्व अपघात व त्यामागील कारणे यांचा शोध घेतल्यास यंत्रणांना आत्मपरीक्षण देखील करण्याची गरज भासणार नाही. घाट क्षेत्रामधील सदरचे अपघात रोखण्यासाठी स्पीड गन कारवाया ऐवजी वाहन चालकांमध्ये जास्तीत जास्त लेनच्या शिस्तीची जागृती करणे महत्त्वाचे आहे. याकरिता प्रत्येक 100 मीटर अंतरावर लेनचे नियम दाखविणारे फलक अथवा रस्त्यांवर मार्किंग करणे गरजेचे आहे. घाट क्षेत्रामध्ये दुतर्फा फोर लेन चे काम जवळपास पूर्ण झाले आहे मात्र केवळ लेनची शिस्त न पाळणे व उतारावर वाहने न्यूट्रल अथवा बंद करून घेऊन जाणे यामुळे दैनंदिन अपघात होत असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

इतर बातम्या