Breaking news

Lonaval RLY News : लोणावळा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा बंद केलेला थांबा पुन्हा सुरु करा - नगराध्यक्षा सुरेखा जाधव

लोणावळा : रेल्वे प्रशासनाकडून मुंबईच्या दिशेने (UP Line) जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा लोणावळा रेल्वे स्थानकातील थांबा बंद करत तो खंडाळा रेल्वे स्थानकावर दिला आहे. यामुळे प्रवासी व कामगार यांची मोठी गैरसोय होत असल्याने रेल्वे प्रशासनाने हा थांबा तात्काळ सुरु करावा अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाप्रबंधक लाहोटी व रेल्वे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा, मुख्यालयातील प्रधान विभागप्रमुख, पुणे शाखाधिकारी यांनी काल लोणावळा ते दौंड विभागाचे वार्षिक परिक्षण केले. सकाळी साडेआठ वाजता ते लोणावळा स्थानकावर आले होते. यावेळी नगरसेवक ललित सिसोदिया, हरी गुप्ता आदींनी त्यांची भेट घेत लोणावळा थांबा सुरु करण्याची मागणी प्रत्यक्ष भेटून केली.

     नगराध्यक्षा जाधव म्हणाल्या, मागील 50 ते 60 वर्षापासून सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबतात. लोणावळा हे पर्यटनस्थळ असल्याने राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यांतून पर्यटक, कामगार याठिकाणी येत असतात. रेल्वे प्रशासनाने मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एक्सप्रेस गाड्याचा लोणावळा थांबा बंद करत खंडाळा येथे थांबा सुरु केला आहे. त्याठिकाणाहून लोणावळ्यात व अन्य ठिकाणी जाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने पर्यटकांचे तसेच नागरिकांचे हाल होत आहेत. लोणावळा रेल्वे स्थानकावर अनेक तरुण हाॅकर्सची कामे करतात. त्यांना देखील यामुळे रोजगाराला मुकाले लागत आहे. यासर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर मुंबईकडे जाणार्‍या गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकावर पुर्वीसारखा थांबा सुरु करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

इतर बातम्या