Breaking news

कोळे चाफेसर येथे गौण खनिजाचे उत्खनन व चोरी; गुन्हा दाखल करण्यावरून दोन शासकीय कार्यालयांमध्ये टोलवाटोलवी

लोणावळा : कोळे चाफेसर येथे पवना प्रकल्पाच्या मालकी क्षेत्रामध्ये अनाधिकृतपणे गौण खनिजाचे उत्खनन व चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधितावर फौजदारी कारवाई करा असा सूचना मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी पवना पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांना दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांनी याप्रकरणी मावळ तहसीलदारांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार यांच्या सूचनेनुसार मंडल अधिकारी काले काॅलनी यांनी सदर जागेवर जाऊन पाहणी केली असता कोळे चाफेसर येथे पवना प्रकल्पाच्या जागेमधून जवळपास 3080 ब्रास दगड उत्खनन करून वाहतूक केली असल्याचे तसेच 150 ब्रास दगड साठा करून ठेवला असल्याचे समोर आले आहे. मंडल अधिकारी यांनी सदरचा पंचनामा अहवाल तयार करत सादर केला आहे. या अहवालाच्या अनुषंगाने तहसिलदारांनी सदरचा आदेश दिला आहे. मात्र सदर जागा पवना धरणाच्या बुडीत क्षेत्रात असल्याने जागेच्या मालकीबाबत अवलोकन होत नसल्याने आपल्याच कार्यालयाच्या स्तरावरून कारवाई व्हावी असा उलट सल्ला उपविभागीय अभियंता पवना पाटबंधारे विभागाने मावळच्या तहसिलदारांना दिला आहे. 

     कोळे चाफेसर येथे गौण खनिजाचे उत्खनन व चोरी झाली ही बाब मंडल अधिकारी यांच्या पंचनाम्यावरून अधोरेखित होत असली तरी चोरी करणार्‍या व्यक्ती कोणी मोठ्या असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल कोणी करायचा यावरून सध्या तरी दोन शासकीय कार्यालयातून टोलवाटोलवी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. स्वतःचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न शासकीय अधिकार्‍यांकडून होत असल्याने तालुक्याचे नुकसान होत आहे. याप्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार असल्याचे प्रकाश पोरवाल यांनी सांगितले.

इतर बातम्या