Breaking news

Ekvira Devi : कार्ला गडावर भाविकांना ना पिण्याचे पाणी ना स्वच्छतागृहाची सुविधा!

लोणावळा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणावळा शहराजवळील कार्ला गडावर भाविकांना पिण्याचे पाणी देखील मुश्किल झाले आहे तसेच स्वच्छता गृहांना टाळे लागले असल्याने महिला भाविकांची मोठी कुचंबना होत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असलेल्या कार्ला गडावरील श्री एकवीरा देवस्थान परिसराचा विकास करण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुलस्वामिनी असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट चा कारभार सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहे. मागील पाच वर्षापूर्वी पासून देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामस्थ यांच्या वाद सुरू असल्यामुळे, सदर ट्रस्ट बरखास्त करत त्याचा ताबा प्रशासनाने घेतला होता. पूर्वी त्रिसदस्यीय समिती हा कारभार पाहत होती मागील दोन वर्षापासून सदर कारभार माननीय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पाहत आहेत. जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या आई एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यांमधून लाखो भाविक गडावर येत असतात. मात्र या भाविकांना गडावर साधे पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध नाही तसेच पाणी टंचाईचे कारण देत स्वच्छतागृहांना टाळे लावण्यात आले आहेत. शेकडो पायऱ्या सोडून देवीच्या दर्शनासाठी गडावर आलेल्या भाविकांना पाणी व स्वच्छता गृह उपलब्ध नसल्यामुळे त्यांची मोठी कुचंबना होत आहे. यामधून अनेक वेळा भाविक व देवस्थानचे व्यवस्थापक कर्मचारी यांच्या वाद देखील होत आहेत. चैत्र यात्रेच्या काळामध्ये हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मावळचे तहसीलदार व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक यांच्या पुढाकारातून दोन्ही प्रश्न सोडविण्यात आले होते. यात्रा संपल्यानंतर मात्र पुन्हा तीच समस्या निर्माण झाली आहे. भाविकां सोबतच या गडावर हार फुले प्रसाद विक्रीचा व्यवसाय करणारे स्थानिक नागरिक यांनादेखील वरील दोन्ही समस्यांचा सामना करावा लागत आहे. दानपेट्यांमध्ये भाविक मोठया श्रद्धेने दान टाकतात मात्र त्या उपयोग भाविकांना सुविधा देण्यासाठी होत नसल्याने या दनापेट्या केवळ पैसा गोळा करण्यासाठी आहेत का असा प्रश्न भाविक उपस्थित करत आहेत. चैत्र यात्रा देखील भाविकांनी वर्गणी गोळा करत साजरी केली. भाविकांनी दान केलेला पैसा भाविकांना सुविधा देण्यासाठी वापरणार नसाल तर दान का करायचे असे प्रश्न उपस्थित करत मुंबई व रायगड जिल्ह्यातील भाविकांना सोशल मिडियावर यापुढे दानपेटीत दान न टाकण्याची मोहिम राबवली होती. भाविक मात्र श्रद्धेपोटी दान अर्पण करतात. त्याचा उपयोग देवस्थान परिसराचा विकास व भाविकांना सुविधा देण्यासाठी होणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही. कचरा ही देखील येथील सर्वात मोठी समस्या आहे. वेहेरगाव ग्रामस्थ व अनेक सामाजिक संघटना यांनी वारंवार याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत परिसरातील कचरा व प्लास्टिक मोठ्या प्रमाणात संकलित केले. मात्र गडावर हार फुलांसाठी प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तसेच भाविक देखील या परिसरामध्ये जेवन बनवल्यानंतर पत्रावळ्या ग्लास व अन्य कचरा तसाच सोडून जात असल्यामुळे कचरा ही कार्ला गडावरील सर्वात मोठी समस्या बनली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसह महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री यांनी कार्ला गड परिसरातील या समस्या सोडविण्याकडे लक्ष देण्यासोबत येथील विकासासाठी योगदान देणे गरजेचे आहे.

इतर बातम्या