Breaking news

युवकांनी सामाजिक कार्यात सहभागी होणे गरजेचे : डॉ. ज्योतिराम मोरे

लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे डॉ. बी.एन. पुरंदरे कला, श्रीमती एस.जी.जी.वाणिज्य व श्रीमती एस.ए. एम.विज्ञान महाविद्यालय लोणावळा, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने  राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. ज्योतिराम मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनातील उदाहणे सांगून आपल्या कार्याचा समाजासाठी काही उपयोग झाला पाहिजे, समाज कार्यात पुढे येणे गरजेचे आहे, तसेच सकारात्मक दृष्टिकोन, वाचन करणे,  नवीन छंद जोपासणे, इतरांचे म्हणणे ऐकून घेणे, निर्णय ठाम घेणे, अपयशाची भीती न बाळगणे, असे अनेक व्यक्तिमत्त्व विकासासाठीचे पैलू स्वयंसेवक आणि उपस्थितांना सांगितले. पर्यावरण, भूगोल, यांचा देखील व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम होतो हे आवर्जून नमूद केले. 

      महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एन.पवार यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमुळेच आम्ही घडलो असल्याचे स‍ांगत, हुंडा बंदी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचे महत्त्व सांगितले. महाविद्यालय चे उपप्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.सविता पाटोळे, शिक्षक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आँनलाईन उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन शिनगारे यांनी केले तर प्रा.धनराज पाटील यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.निलेश काळे यांनी मानले.

इतर बातम्या