Breaking news

महागाईचे चटके; घरगुती गॅस व व्यावसायिक गॅसच्या दरात पुन्हा वाढ

मुंबई : एक हजार रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचलेले घरगुती सिलिंडरचे दर (LPG Gas cylinder) आता हजारच्या पार गेले आहेत. मुंबईसह दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1000 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आठ रुपयांनी वाढली आहे. राज्यासह देशात महागाईचा भडका उडालेला आहे. अशातच सर्वसामान्यांचं बजेट आता आणखी कोलमडण्याची शक्यता आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या नव्या दरानुसार मुंबई आणि राजधानी दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलिंडरचे दर 1 हजार 3 रुपये इतके झाले आहेत. कोलकत्ता येथे या गॅसचा दर 1,029 रुपये इतका आहे. तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1018 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. या आधी 7 मे रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

सात मे रोजी झाली होती भाववाढ

गॅस सिलिंडरच्या दरात वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या दरात साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली असून, व्यवसायिक सिलिंडर देखील आठ रुपयांनी महागला आहे. यापूर्वी सात मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या 15 दिवसांमधील आज करण्यात आलेली ही दुसरी दरवाढ आहे. त्यापूर्वी एक मे रोजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. आज व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.

बजेट कोलमडणार?

एकीकडे देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे इतर इंधनात सीएनजी, पीएनजी, एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दीड महिन्यात सीएनजीच्या दरात चारदा वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरचे दर पंधरा दिवसांमध्ये दोनदा वाढवण्यात आले आहेत. आता गॅस सिलिंडर घेण्यासाठी तब्बल एक हजार रुपयां पेक्षाही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. याचा परिणाम हा सर्वसामांन्यांच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे.

हॉटेलमधील जेवण देखील महागणार

व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर झपाट्याने वाढत आहेत. एक मे रोजीच व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली होती. आज पुन्हा एकदा व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर आठ रुपयांनी वाढवले आहेत. व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात होणारी वाढ पहात आता हॉटेलचे जेवण आणखी महाग होण्याची शक्यता आहे. महागाई गेल्या 9 वर्षातील उच्चस्थरावर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आता गॅस दरवाढीने देखील सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.

इतर बातम्या