Breaking news

Ajit dada Pawar l मावळ तालुक्याच्या नियोजनबध्द विकासासाठी व पर्यटनास चालना देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार


वडगाव मावळ : मावळ तालुक्यात लोणावळा सारखे पर्यटन स्थळ आहे, श्री. एकवीरा देवी सारखे तीर्थ क्षेत्र असून तालुक्याच्या नियोजनबध्द विकासासाठी, पर्यटनास चालना देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. मावळ तालुक्यातील कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण सोहळा, टायगर पॉईंट येथील ग्लास स्कायवॉक तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुनील शेळके, तहसिलदार विक्रम देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, माजी आमदार श्रीमती रुपलेखाताई ढोरे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, आरपीआयचे नवोदित प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, माजी सभापती विठ्ठल शिंदे, सुरेश चौधरी, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा दिपाली गराडे आदी उपस्थित होते. 

    यावेळी बोलताना अजित दादा म्हणाले, आपल्याला महाराष्ट्राचे उज्वल भविष्य निर्माण करायचे असेल, तर केंद्रातील मोदी सरकारच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात आणले पाहिजे. यासाठी महायुतीच्या सर्व मित्र व घटक पक्षांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहून त्यांना प्रामाणिकपणे निवडून आणायचे आहे. प्रत्येकाने महायुतीचा उमेदवार म्हणूनच त्यांना मतदान करायचे आहे. आपली अनेक दशकांपासूनची जी मागणी होती की, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. परंतु आतापर्यंत अनेक सरकारे आली व गेली. त्यांनी याकडे गांभीर्याने घेतले नाही. अखेर काल घटस्थापनेच्या दिवशीच केंद्रातील मोदी सरकारने आपल्या मराठी मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या निर्णयाचे महाराष्ट्रासह जगभरातील मराठी भाषिकांकडून स्वागत केले जात आहे. मीही आपल्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदी सरकारचे आभार मानतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिपादन केले.

      अजित पवार म्हणाले, निवडणूक म्हटले की, प्रत्येकाला निवडणूक लढण्याची इच्छा असते यात काही गैर नाही. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. यासाठी कोणीही एकमेकांसोबत गैरसमज करू नका.

तालुक्यातील जनतेवर कोणी दहशत व दबाव आणू नका. जर कोणी असे करत असेल तर मी जनतेच्या हितासाठी मागे पुढे पहाणार नाही. - आमदार सुनील शेळके 

काही मंडळींना आमदारकीचे स्वप्न पडत आहे. परंतु त्यांना आमदार कशासाठी व्हायचे हेच कळत नाही. त्यांना तालुक्यातील विकासाचा रथ थांबवायचा आहे. जर ते असे करणार असतील, तर तालुक्यातील मायबाप जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. काम करण्यासाठी जनता निवडून देते, प्रश्न सुटले पाहिजे म्हणून प्रत्येक तालुक्यातून लोकप्रतिनिधी निवडून दिला जातो. मात्र काही मंडळी माझ्यावर टीका टिपणी करत माझी बदनामी करतात. मला कोणावर टीका करायची नाही. माझी कोणी बदनामी करू नका व बदनामीचा प्रयत्न करू नका अनेक जण इच्छुक आहेत. युतीकडून कोणाला उमेदवारी मिळेल हे कोणाला तसेच मलाही माहिती नाही. मावळच्या जनतेला दहशत व दडपशाही खाली आणू नका. जर कोणी असे करणार असेल, तर मीही जनतेसाठी मागेपुढे पाहणार नाही. काहीजण आपले भांडे फुटेल म्हणून आजच्या कार्यक्रमाला आले नाही. असा टोला सुनील शेळके यांनी इच्छुकांना लगावला. 

अजित दादांचा सुनील शेळकेंना सबुरीचा सल्ला 

आज आपल्या भाषणाच्या ओघात सुनील शेळके यांनी त्यांच्यावर टीका टिपणी करणारे व तालुक्यातील कार्यकर्ते व जनतेवर दहशत व दबाव निर्माण करणाऱ्यांचा समाचार घेत त्यांना धारेवर धरत आपल्या शैलीत इशारा दिला. जर कोणी तालुक्यातील जनतेवर दहशत व दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर मीही जनतेच्या साठी मागेपुढे पाहणार नाही असा इशारा दिला. यावरून अजित दादांनी आज सुनीलची गाडी फारच झाली गरम होती. पण राजकीय व सामाजिक जीवनात सबुरीची गरजेची असते असा सबुरीचा सल्ला दिला. आपल्याला सर्वांची गरज आहे, आपल्याला कोणाला विनाकारण नाराज करायचे नाही. अशाने फार काही साध्य होत नाही. पण आपण चांगले काम केल्यानंतर मनाला वेदना होणारच हे साहजिकच आहे असे देखील सांगितले.

इतर बातम्या