Breaking news

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन

लोणावळा : पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोरोनामुळे दुःखद निधन झाले. ते 42 वर्षांचे होते.  त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई, वडील असा परिवार आहे. टिव्ही 9 या वृत्तवाहिनीचे ते पत्रकार होते.

   रायकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर कोपरगाव येथील कोव्हिड केअर सेंटरमधून त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हालविण्यात आले. मात्र रुग्णालयाच्या प्रशासनाने प्रथम 40 हजार रुपये भरा मंगच दाखल करून घेऊ असे सांगितले. नातेवाईकांनी पैसे भरण्याची तयारी दाखवली मात्र पहिले पैसे जमा करा असा तगादा लावत रुग्णालयाने रायकर यांना दाखल करून घेण्यास सुमारे अडीच ते तीन तासाचा विलंब लावला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कोपरगावच्या स्थानिक पत्रकारांनी ही बाब तहसिलदार व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. सरकारी कार्यालयातून फोन गेल्यानंतरही अर्धा तासाने त्यांना दाखल करण्यात आले मात्र योग्य उपचार केले गेले नाहीत. पैसे नाहीत म्हणून कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही असे शासन सांगत असताना खाजगी रुग्णालये मात्र शासन आदेशाला जुमानत नाहीत. कोरोना योद्धा म्हणून मागील साडेपाच महिने समाज जागृतीचे काम करणारे तसेच पुण्यातील अनेक समस्यांना वाचा फोडणारे पांडुरंग रायकर हे आज वैद्यकीय हलगर्जीपणामुळे आपल्यात नाहीत. एका कोरोना योद्धाच्या बाबतीत असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल, याचा शासनाने गांर्भिर्याने विचार करणे गरजेचे आहे. तसेच पैशासाठी रुग्णांची आडवणूक करणार्‍या रुग्णालयावर देखील कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांच्या संघटनांकडून करण्यात आली आहे.

इतर बातम्या