Breaking news

नागरिकांनो सावधान - खंडाळा रहिवासी भागात बिबट्याचे दर्शन

लोणावळा : येथील खंडाळा विभागातील रहिवासी भागामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. मागील काही दिवसांपासून हा बिबट्या सातत्याने दिसून येत असून गुरुवारी सकाळी एका कुत्र्याला या बिबट्या ठार केले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.

   लोणावळा आणि खंडाळा शहराच्या आसपास मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. शहराला लागूनच असलेल्या राजमाचीच्या जंगलात बिबट्याचा सातत्याने वावर असतो, मात्र लोणावळ्यात किंवा खंडाळ्यात मागील अनेक वर्षांपासून बिबट्या सारखे श्वापद कोणाच्याही बघण्यात आलेले नाही. दोन आठवड्यापूर्वी राजमाचीच्या जंगलात फणसराई तसेच वळवंडे येथे बिबट्याने काही पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता खंडाळ्यासारख्या रहिवासी भागात बिबट्याचे झालेले दर्शन आणि त्याने केलेली कुत्र्याची शिकार हे नागरिकांसाठी धोक्याची घंटा देणारी आहे. 

खंडाळा विभागाचे वनपाल सागर चुटके यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी बिबट्या दिसून आल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली असल्याचं सांगत संबंधित ठिकाणी भेट देऊन आपण सातत्याने लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ज्या घरापाशी या बिबट्याचे अस्तित्व आढळून येत आहे तेथील नागरिकांना योग्य त्या खबरदारीच्या सूचना दिल्या असल्याचंही सांगितले.

इतर बातम्या