Breaking news

रिंग रोडसाठी भंडारा डोंगराला बोगदा पाडणार नाही - खासदार श्रीरंग बारणे

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील प्रस्तावित रिंगरोड हा श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून होणार नाही. डोंगराच्या बाजूने 'रिंगरोड’ होईल. त्यानुसार सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

    पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंगरोडबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सोमवारी (दि. 13) बैठक झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते, संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, संजय जगताप, अशोक पवार, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे आणि एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते. 

     बैठकीत खासदार बारणे म्हणाले, प्रस्तावित रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून जात असल्याचे नकाशामध्ये दाखवत आहे. डोंगराला बोगदा करण्यास वारकऱ्यांचा व संस्थानचा तीव्र विरोध आहे. वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेता भंडारा डोंगराला भेदून जाणाऱ्या रिंगरोडच्या रेखांकनात बदल करावा. रिंगरोड डोंगराच्या बाजूने घेण्यात यावा. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली. त्यानुसार सर्व्हे करण्याबाबत त्यांनी आदेश दिले. त्यामुळे रिंगरोड भंडारा डोंगराला भेदून जाणार नसल्याचे स्पष्ट झाले. भंडारा डोंगराला बोगदा पाडून रिंगरोड करण्याच्या प्रस्तावित नकाशाला वारकरी वर्गाने तिव्र विरोध केला होता तर वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. वारकरी सांप्रदायाच्या भावना भंडारा डोंगराचे ऐतिहासिक महत्व ध्यानात घेता सदरचा निर्णय घेण्याचा आला आहे.

इतर बातम्या