Breaking news

AAI LAXMI DEVI : वलवण गावातील आई लक्ष्मी देवी

लोणावळा : वलवण गावात पाळेकर निवास याठिकाणी आई लक्ष्मी देवीचे मंदिर आहे. मंदिर काही वर्षापुर्वी बांधण्यात आले असले तरी याठिकाणी असणार्‍या देवीचे स्थान फार पुरातन आहे. साधारणतः दिडशे ते दोनशे वर्षापासून किंबहूना यापेक्षाही अधिक काळापासून देवीचे स्थान याठिकाणी असावे असे येथील सुनिल आप्पा पाळेकर यांनी सांगितले.

या देवस्थानाबाबत काही दंतकथा आहेत. यापैकी एक अशी आहे की, 1914 साली वलवण धरणाचे काम सुरु असताना वडारी समाजातील एका व्यक्तीच्या मागे आगी मोहोळ लागले होते. तो मोहोळापासून जीव वाचवत धावत असताना याठिकाणी शेतात आडोश्याला थांबला तेव्हा त्याला सदरचे मोहोळ अचानक नाहीसे झाल्याचे जाणवले. त्याचवेळी त्यांला सदरची शिळा नजरेस पडली. त्याने ती बाहेर काढत तीचे पुजन केले. आजही त्यांचे वारस देवीचे देवकार्य करण्यासाठी व देवीला मान देण्यासाठी याठिकाणी येत असतात.

दुसरा एक संदर्भ आहे की, वलवण धरणाचे काम ज्यावेळी हाती घेण्यात आले, त्यावेळी धरणातील काही गावे विस्तापित झाली. काही लोकं वलवण गावात राहण्यासाठी आली काही इतरत्र स्थायिक झाली. सध्या आळेफाटा जुन्नर भागात राहणारे वलवणकर मंडळी या देवीला त्यांची कुलस्वामीनी मानतात, पुर्वी ते वलवण गावात रहात असल्याने त्यांचे आडनाव वलवणकर पडले आहे. 

या देवीच्या अंगावर शेंदूराचे जे मार्जन करण्यात येते, त्याचा एक फार मोठा भाग कालांतराने निघाला आहे. त्यांचा अभ्यास करता व त्यावरील शेंदूर मार्जनाचे निरिक्षण करता हे देवालय फार प्राचीन असल्याचे जाणवते. देवीला आई लक्ष्मी देवी या नावाने संबोधले जाते मात्र त्याविषयी फार माहिती उपलब्ध नाही.

समस्त पाळेकर कुटुंबाची देवी लक्ष्मी कुलदेवी असून समस्त पाळेकर कुटुंबीय देवीची दर तीन वर्षांनी पांजी व इतर कुलाचार अत्यंत मनोभावे करतात.

      शेताच्या जागी पाळेकर परिवाराने घर बांधल्यानंतर मागील काही वर्षापासून पाळेकर परिवार या देवस्थानाची मनोभावे सेवा करत आहे.

देवीच्या समोर मनोभावे एखादे मागणे मागितले तर ते पुर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने केवळ वलवण गावातील नव्हे तर लोणावळा शहर व पंचक्रोशीतील भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येत असतात. नवरात्र उत्सव काळात तसेच वर्षभर येथील व्यवस्था पाळेकर कुटुंबातील सदस्य पहातात.

इतर बातम्या