कर्करोग आजारामध्ये योगा व्याप्ती, प्रमाण व विकास या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद कैवल्यधाम योग संस्थेमध्ये संपन्न
लोणावळा : आयुष मंत्रालय नवी दिल्ली, इंडियन योगा असोशिएशन नवी दिल्ली, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या सहयोगाने लोणावळ्यातील कैवल्यधाम या आंतरराष्ट्रीय योग संस्थेमध्ये 4 ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान कर्करोग आजारामध्ये योगा व्याप्ती, प्रमाण व विकास या विषयावर अकराव्या आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस या परिषदेमध्ये कर्करोग या आजारावर योगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने मात करता येते यावर विचार मंथन झाले.
लोणावळा येथे 1924 साली स्वामी कुवलयानंद जी यांनी कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली होती. योग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाची कैवल्यधाम ही एक प्राचीन योग संस्था आहे. 7 ऑक्टोबर 2024 रोजी संस्थेने आपली शतकपूर्ती केली आहे तसेच संस्थेच्या 2023-24 या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत. आपल्या शतकपूर्तीचे औचित्य साधून संस्थेने "कर्करोग मे योग" व्याप्ति, प्रमाण एवं विकास " या विषयावरील एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देश विदेशातील प्रतिनिधी Onsite आणि Online मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी, कैवल्य विद्या निकेतन शाळेतील शिक्षक वर्ग यांनी सुद्धा सक्रीय सहभाग घेतला होता.
4 डिसेंबर रोजी परिषदेमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिर्धीची नोंदणी (Registration) करण्यात आली तसेच परीषदे पूर्वी Workshop - Qualitative research methods in yoga आणि Workshop Research methods for designing yoga studies in cancer या विषयांवरील दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.
5 डिसेंबर 2024 रोजी सकाळी महर्षी पतंजली यांची मंगलमय वातावरणात पुजा करण्यात आली. यानंतर 11 व्या आंतरराष्ट्रीय योग परिषदेच्या उद्घाटनाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ. पंकज चतुर्वेदी (Director of the Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer, Tata Memorial Centre) यांच्या शुभ हस्ते कैवल्यधाम योग संस्थेचे अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी, कैवल्यधाम संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, डॉ. सतबीर खालसा, डॉ. पो. जु.लिन आणि डॉ के. एस. गोपीनाथ यांच्या प्रमुख उपस्थितील दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. श्री सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केले आणि व्यासपीठावरील उपस्थित पाहुण्यांचा संक्षिप्त स्वरूपात परिचय करून दिला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी यांनी प्रमुख पाहुणे डॉ. पंकज चतुर्वेदी यांना कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा आणि शाल देऊन सन्मानित केले. तसेच संस्थचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी व्यासपीठावरील मान्यवर डॉ. सतबीर खालसा, डॉ.पा.जु.लिन, डॉ. के. एस. गोपीनाथ यांचा शाल आणि योगविषयक पुस्तके देऊन सन्मान केला. यानंतर कैवल्यधाम संस्थेचा माहितीपट दाखविण्यात आला. डॉ. सतबीर खालसा यांनी उपस्थितांना संबोधित केले. या नंतर "कर्करोग मे योग" या विषयावरील माहितीपट दाखविण्यात आला या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेतील प्रथम टप्प्यावरील कर्करोगावर योगाद्वारे मात केलेल्या बहुकुशल कामगार श्रीमती सुनीता फतरोड हिच्या जीवनावरील माहितीपट दाखवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.पा.जु.लिन आणि डॉ. के. एस. गोपीनाथ यांनी उपस्थितांना आपल्या भाषणशैलीतून संबोधित केले. यानंतर कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची, व संस्थेस भेटी दिलेल्या मान्यवरांची चित्रफितीद्वारे माहिती संक्षिप्त स्वरूपात दाखविण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभारप्रदर्शन शनाया वात्सायन यांनी केले. "ओम पूर्ण मद" शांती पाठाने उद्घाटन समारंभाची सांगता करण्यात आली. या परिषदेमध्ये 5 ते 7 डिसेंबर दरम्यान योग तज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, योग प्रात्याक्षिके, स्वतःची काळजी घेण्यासाठी क्रिया योग, पोस्टर सादरीकरण आयोजित करण्यात आली होती. तसेच पद्मश्री डॉ. काळूराम बामनिया आणि संघाचा कहत कबीर सुनो भाई साधो" कबीर आणि इतर लोकगीतांची मैफल आणि श्रीमती रामा कुकनूर यांचे "थीम आधारित नृत्य योग" या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या दोन्हीही कार्यक्रमांस उपस्थितांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कैवल्यधाम संस्थेच्या उत्पत्ती विभागाकडून पारंपारिक योग, योग प्रशिक्षण, योग चिकित्सा इत्यादी योग विषयक पुस्तके, शुद्धीक्रिया साहित्य, योगा म्याट, ट्रेक सूट, टी शर्टस तसेच आरोग्य उत्पादने विक्रीस ठेवण्यात आली होती त्यास उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
संस्थेकडून परिषदेमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींची राहण्याची आणि सात्विक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. परिषदेचा निरोप आणि पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी प्रमुख पाहुणे मेजर जनरल (डॉक्टर) श्री अमूल कपूर (Deputy Commandant Army Hospital (R&R) New Delhi), डॉ. सुनिल सैनी, कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी, संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी आणि अनुसंधान अधिकारी डॉ. रणजित सिंग भोगल यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी "पेपर वाचन" आणि "पोस्टर सादरीकरण" तसेच "कर्करोगावर योगाद्वारे मात या विषयावरील लघुपट" या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांना "सर्वोत्कृष्ट पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.
• सर्वोत्कृष्ट "पेपर वाचन" चे मानकरी डॉ. इन्बाराज.
• सर्वोत्कृष्ट "पोस्टर सादरीकरण" ची मानकरी श्रीमती श्रीक्रीतीका पी. आणि उपविजेती लोकमित्रा आर.
• सर्वोत्कृष्ट " लघुपट" ची मानकरी सुरिया मोहन वालिया आणि उपविजेती प्रिया याना देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शनया वात्सायन यांनी केले आणि आभारप्रदर्शन डॉ. रणजीत सिंग भोगल यांनी केले. आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता शांतीपाठाने करण्यात आली. सदर आंतरराष्ट्रीय योग परिषद यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कैवल्यधाम योग संस्थेचा अधिकारी व कामगार वर्ग तसेच गोवर्धनदास सक्सेरिया योग महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग, कैवल्य विद्या निकेतन शाळेतील शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस यंत्रणा आणि टाटा पॉवर हाऊस यांचे विशेष सहकार्य लाभले.