Breaking news

पवनानगर बोट दुर्घटना व दोन तरुणांच्या मृत्यूप्रकरणी बंगला मालक व बोट मालकांवर गुन्हा दाखल

लोणावळा  : मावळ तालुक्यातील पवना धरणामध्ये चार डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पाण्यामध्ये बोट पलटी होऊन दोन जण बुडून मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटने प्रकरणी सदरचे तरुण पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरामध्ये ज्या बंगल्यावर राहिले होते व ज्या बोटीने त्यांनी प्रवास केला, त्या बंगला मालक व बोट मालक या दोघांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत मयत झालेला तुषार अहिरे याच्या नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.

      मूळचे भुसावळ येथील असलेले तुषार अहिरे व मयूर भारसाके हे त्यांच्या इतर मित्रांच्या सोबत मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरामध्ये चार डिसेंबर रोजी फिरायला आले होते. पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात असलेल्या लेक इस्केप व्हिला या बंगल्यात ते थांबले होते. सदरचा बंगला हा पवना जलाशयाच्या बॅक वॉटर ला लागूनच आहे. तेथूनच थेट धरणामध्ये उतरण्यासाठी रस्ता आहे. जलाशयामध्ये सुमती व्हिवा यांची एक बोट देखील होती. तुषार अहिरे, मयूर भारसाके व त्यांचा अन्य एक मित्र सदरची बोट घेऊन पाण्यामध्ये फेरफटका मारायला गेले होते. पाण्यामध्ये सदरची बोट पलटी होऊन तुषार व मयूर हे पाण्यात पडले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा देखील पाण्यात बुडून दुर्दैवी असे मृत्यू झाला होता. मयत मुलांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले.

इतर बातम्या