Breaking news

खंडाळ्यात अवैध दारू विक्री; एक जणांवर गुन्हा दाखल - 10 हजाराची दारू जप्त

लोणावळा : खंडाळा येथे अवैध रित्या दारू विक्री सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा मारत एक जणाला ताब्यात घेत त्याच्याकडून 10 हजार रुपये किंमतीचा दारुसाठी जप्त करण्यात आला असल्याची माहिती कार्तिक यांनी दिली.

    31 डिसेंबर च्या अनुषंगाने अवैध व्यवसाय करणारे विक्रेते व व्यावसायिक यांची माहिती काढत पोलीस दलाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत व वडगाव या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून सातत्याने कारवाई मोहिमा सुरू असताना देखील अवैध व्यवसाय करणारे मागे हटताना दिसत नाही. विविध ठिकाणी चोरून लपून हे व्यवसाय सुरू आहेत. स्थानिक नागरिकांना देखील याबाबत माहिती असते मात्र नको ती कटकट मागे म्हणत कोणीही माहिती देण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. खरंतर ज्या गावात अवैध व्यवसाय सुरू आहेत त्या गावातील पोलीस पाटील यांनी देखील याबाबत पोलीस स्टेशन ला अवगत करणे क्रमप्राप्त असते मात्र तसे देखील होत नसल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी मात्र या अवैध व्यवसायांना चाप लावण्यासाठी कंबर कसली असून धडक कारवाई मोहिमा हाती घेतल्या आहेत. संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेत त्यांनी प्रथम जनजागृती करण्याचा प्रयत्न केला मात्र सरळ सांगून लोक ऐकत नसल्याने कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याचे आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले.

    खंडाळा गावात अजय उर्फ बाबा जांभूळकर ही व्यक्ती घरात अवैधरीत्या दारूचा साठा करत त्याची विक्री करत असल्याची माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने लोणावळा शहर पोलीस पथकाच्या समवेत छापा मारला असता 10 हजार रुपये किंमतीचा दारू साठा मिळून आला आहे.

     या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फिर्यदिवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे  कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत. सदरची कारवाई ही लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरिक्षक शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार नितेश कवडे, पोलीस कॉन्स्टेबल रईस मुलानी यांच्या पथकाने केली.

इतर बातम्या