Breaking news

PMRDA च्या विकास आराखड्यावर नागरिकांच्या 61 हजार हरकती दाखल

लोणावळा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने 2 आँगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप विकास आराखड्यावर 45 दिवसात 61 हजार सूचना व हरकती दाखल झाल्या असल्याची माहिती PMRDA चे आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली.

   PMRDA च्या प्रारुप विकास आराखड्यावर सूचना व हरकती दाखल करण्यासाठी 16 सप्टेंबर पर्यत मुदतवाढ देण्यात आली होती. काल ही मुदत संपली. लवकरच या सर्व हरकती व सूचनांवर सुनावणी घेतली जाणार आहे. याकरिता एक वेगळा विभाग तयार करण्यात येणार आहे.

      पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या वतीने 2/8/2021 रोजी प्रारुप विकास आराखडा राजपत्रात प्रसिद्ध करत नागरिकांना त्यावर सूचना व हरकती दाखल करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानंतर नागरिक व लोकप्रतिनिधी यांची मागणीनुसार पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. सदरचा प्रारुप विकास आराखडा तयार करताना अनेक ठिकाणी अन्यायकारक आरक्षणे टाकण्यात आल्याने शेतकरी उध्वस्त होण्याची भिती वर्तवली जात आहे. कार्ला परिसरातील 23 गावातील नागरिकांनी या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी व हरकती दाखल करण्यासाठी दोन कृती समित्या स्थापन केल्या आहेत. यापैकी एकविरा कृती समितीच्या वतीने 8 सप्टेंबर रोजी कार्ला फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. तर दुसऱ्या समितीच्या माध्यमातून गाव बैठका घेत हरकती दाखल केल्या आहेत.

       PMRDA कार्यक्षेत्र हे 6914 चौरस किमी अंतराचे असून त्यामध्ये 814 गावांचा समावेश आहे. 1997 साली PMRDA चा रिजिनल प्लॅन तयार करण्यात आला होता. तत्कालिन लोकसंख्या व वाढीचा विचार करुन तो बनविण्यात आला होता. त्यानुसार पुणे   पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राच्या लगय तसेच हायवेच्या बाजुने व मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनिर्बंध वाढ झाली. याकरिता भविष्यातील पुढील 20 वर्षाचा विचार व संभाव्य लोकसंख्या ध्यानात घेत सध्याचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा तयार करत असताना महसुल, वन विभाग, महामार्ग प्राधिकरण, पाटबंधारे व जलसंपदा विभागा यांच्याकडून माहिती घेऊन तो तयार करण्यात आलेला आहे. ऐवढ्या मोठ्या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करताना काही चुका अथवा कमतरता असतील तर त्या सदरच्या सूचना व हरकतीच्या माध्यमातून सोडविण्यात येतील असे दिवसे यांनी सांगितले. तसेच त्यांनी आराखड्यातील झोन बद्दल माहिती देत कोणत्या झोन मध्ये काय करता येऊ शकते याबाबत माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.

इतर बातम्या