कुणेनामा येथील एका बंगल्यातील केअर टेकरच्या खोलीत चोरी; 2 लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास
लोणावळा : कुणेनामा येथील दिव्या सोसायटी श्रीजी व्हीला बंगला क्रमांक 10 मधील केअर टेकर च्या खोलीचा दरवाजा खोलत अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे 2 लाख 16 हजार 700 रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. 20 जुलै रोजी रात्री 8.30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली आहे. बंगल्याच्या सीसीटिव्ही फुटेज मध्ये सदर चोरट्यांची छबी टिपली गेली आहे.
मावळ माझा बातमीपत्राचा वाॅटस्अप ग्रुप जॉईन करा
भारती विजय मोरे यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे ह्या श्रीजी व्हिला बंगला क्रमांक 10 मध्ये केअर टेकरचे काम करतात. 20 जुलै रोजी बंगल्याचे मालक बंगल्यात राहण्यासाठी आले होते. जास्त लोकं असल्याने सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. भारती मोरे, त्यांचे पती व मुलगा हे क्लब हाऊसमध्ये त्यांना जेवण दिल्यानंतर घरी गेले असता, घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात जाऊन बघितले असता कपाट उघडलेले होते तसेच मुलाची वह्या पुस्तके जमीनीवर पडलेली दिसली. म्हणून चेक केले असता कपाटातील सोन्याचा ऐवज चोरट्याने दरवाजाची कडी खोलून चोरून नेला असल्याचे दिसून आले आहे. सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, वेल, कर्णफुले, नथ याचा समावेश आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शकील शेख सीसीटिव्ही फुटेज व तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हाचा तपास करत आहेत. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.