अवैधरित्या वन उपज वाहतूक करणारे वाहन वनविभागाने घेतले ताब्यात; ट्रकमध्ये 13 टन लाकूड
लोणावळा : अवैधरित्या वन उपज वाहतूक करणारे वाहन वनपरिक्षेत्र शिरोता (ता. मावळ) यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. या ट्रक मध्ये तब्बल 13 टन वजनाचे लाकूड असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
आज शनिवारी (26 ऑक्टोबर) रोजी जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग मुंडावरे गावाच्या हद्दीत उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक (MH 03-CP 9552) ची पाहणी केली असता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन उपज मिळून आले. सदरचे वन उपज हे महाराष्ट्र सॉ मिल दावरवाडी तालुका पैठण येथून मुंबईकडे वाहतूक करत असताना वनरक्षक डी. पी. चव्हाण व वनपाल सागर चुटके यांनी जुन्या पुणे मुंबई हायवे लगत उभ्या असणाऱ्या ट्रकच्या मागील हौदाची झडती घेतली असता सदर वाहनात इमारती लाकूड, आंबा, लिंब, बाभूळ, गुलमोहर इत्यादी प्रजातींचे 13 टन वजनाचे अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तत्काळ वन गुन्हा नोंदवून सदरील वनोपजासह वाहन जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी जप्त मुद्देमालाबाबत तपास सुरू असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सोमनाथ ताकवले यांनी सांगितले.